"ज्ञानमयो भव !" असे ज्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे, त्या संस्थेचा वटवृक्षाप्रमाणे झालेला विस्तार म्हणजे ही गरूडभरारीच आहे. मॉडर्न निगडीची स्थापना 26 जून 1986 ला झाली. या दिवशी 'अंगारिका चतुर्थी' होती. यमुनानगर येथे मॉडर्न ची शाखा असावी असे येथील सुशिक्षित मध्यम वर्गीय सुजाण नागरिकांना वाटत होते. त्यांच्या या विचाराला प्रो.ए.सो.चे कार्याध्यक्ष मा. श्री. डॉ. गजानन एकबोटे यांनी संमती दिली. प्रो. ए. सो. चे उपसचिव मा. श्री. शरद इनामदार व त्यांचे काही मित्र यांच्या पुढाकाराने सन 1986 मध्ये दोन बंगल्यात या शाळेची स्थापना झाली.
शाळेच्या उदघाटनाच्या दिवशी त्यावेळचे महापौर मा. श्री. भार्इ सोनवणे, आमदार मा.श्री. अशोकजी तापकीर, त्यावेळचे पिंपरी चिंचवड चे नगरसेवक, प्रो.ए. सो. चे कार्याध्यक्ष मा. श्री. डॉ. गजानन एकबोटे, प्रो.ए.सो. चे उपसचिव मा. श्री. शरद इनामदार, त्यांचे सहकारी, इच्छुक पालक, नागरीक या कार्यक्रमास उपस्थित होते. शिशू वर्गाचे प्रथम उदघाटन झाले. त्या वर्षी 60 विदयार्थ्यांपासून सुरूवात झाली. पुण्यात नावलौकिक असलेल्या नामांकित शाळेत आपल्या पाल्याला शिक्षण मिळावे, सामान्य माणसाची गरज पूर्ण व्हावी,अशा रास्त विचारांनी 'प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची मॉडर्न शाळा यमुनानगर, निगडी येथे सुरू झाली. प्रथम वर्षी विना अनुदानित तत्वावर दोन बंगल्यात (किर्लोस्कर ग्रुपचे) शाळा सुरू झाली. येथील नागरीकांनी शाळेसाठी खुप सहकार्य केले. नंतर तुकडी वाढत गेल्यावर म.न.पा.च्या काळभोर गोठयाच्या समोरील इमारतीत शाळा सुरू झाली. सन 1990 मध्ये स्वत:च्या इमारतीमध्ये इ. 1 ली ते 4 थी चे वर्ग सुरू झाले.
"न भुतो न भविष्यती !" असे म्हणत या शाळेची भरभराट झाली. 60 विद्यार्थ्यांचे 1600 विद्यार्थी झाले. इ. 1 ली ते 10 वी पर्यंतच्या 3 - 3 तुकडया झाल्या असून प्रत्येक वर्गात 60 - 60 विद्यार्थी आहेत. सुसज्ज हवेशीर वर्ग, विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था, खेळण्यासाठी मैदान, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वतंत्र स्वच्छता गृहे, प्रशिक्षित शिक्षक वृंद, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी ज्ञान ग्रहण करीत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास येथे होत आहे. ''ज्ञान संग्रह प्रबळ करण्याचे प्रमुख साधन म्हणजे वाचन त्यासाठी शाळेत सुसज्ज असे विद्यार्थी वाचनालय आहे. ''शिक्षक हा नेहमी नव नवीन ज्ञान संपादन करून विद्यार्थ्यांपर्यंत त्या ज्ञानाचा ओघ नेणारा असावा. म्हणून शिक्षक वाचनालयही येथे आहे. तंत्रशिक्षण, संगणक हे आधुनिक ज्ञानही दिले जाते.
''नवे नवे ते जाणवे आनंदे पोचवावे निज विद्यार्थी गणास !"
असे म्हणत वक्तृत्व स्पर्धा, समूहगीत स्पर्धा , नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, बालनाटय स्पर्धा, चर्चा सत्रे, प्रश्नमंजुषा, सहल, वैज्ञानिक प्रदर्शन, यांच्यात विद्यार्थी हा यशस्वी व्हावा या साठी शिक्षक विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करतात.
या विज्ञान युगात ज्ञानसंपादनाची विद्यार्थ्यांची क्षमता व कुशलता वृदिधंगत करणे हे शिक्षकांचे आदय कर्तव्य आहे. म्हणून विविध स्पर्धा, वैयत्किक अनुभव उपलब्ध वेळ यांची सांगड घालून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शाळेत शिकविले जातात. विद्यार्थी हा माणूसकी जापणारा आदर्श नागरीक बनवला जातो. पी.र्इ.सोसायटीने फक्त विद्यार्थीच डोळयापुढे ठेवला नाही तर आपण या समाजाने कोणी तरी देणे लागतो.हे उद्दिष्ट डोळयापुढे ठेवून समाजप्रबोधनाचे शुभकार्य हाती घेतले आहे. विद्यार्थीच नव्हे तर समाजातील नागरीक हेही ज्ञानसंपन्न व्हावे म्हणून गेली वीस वर्षे 'वसंतव्याख्यानमाला येथे आयोजित केली जाते. पालकांसाठी विविध स्पर्धा राबविल्या जातात जसे पाककला, प्रश्नमंजुषा, मेहंदी, रांगोळी स्पर्धा घेतल्या जातात. विविध व्याख्यात्यांचे व्याख्यान ऐकवून समाजप्रबोधन केले जात आहे.
अशी गरुड झेप घेत मॉडर्नचा विस्तार होत आहे.ही प्रगती पाहून असे म्हणावेसे वाटते.
" इवलेसे रोप लावीयेले व्दारी ; त्याचा वेलू गेला गगनावरी ।। "
क्षितीजापलिकडे जाणारा हा पी र्इ सोसायटीचा उत्कर्ष पाहून मन तृप्त होते.
भविष्यातही असाच विस्तार होर्इल; आणि आम्ही तो करूच ! हा दृढ विश्वास आहे.